Tue, 9/28/10, From Tushar Dalvi
Wishing you a Very Happy 81st Birthday, Lata Mangeshkar. You are truly the Melody Queen of India. My generation feels lucky growing up listening to your melodious voice and you singing one gem after another. 'स्वरसम्राज्ञीच्या श्रेष्ठत्वाचा मागोवा' मराठी नाटय़क्षेत्रातील प्रख्यात गायक अभिनेते मास्टर दीनानाथ यांची लता ही ज्येष्ठ कन्या! दीनानाथजी म्हणजे राजबिंडे रूप. तेजस्वी, आवेशपूर्ण आवाज! त्यांच्या भिंगरीसारख्या ताना. त्यातून होणारा रसाविष्कार, शब्दांची ऐटदार फेक केवळ अद्वितीय होती. लताला आपल्या पित्याचा वारसा मिळाला. त्यांनी चिमुकल्या लताच्या गळ्यातील उपजत नैसर्गिक कोमल गांधार अचूक पारखला. गळ्यातील कोमल गांधार हा गायनातील आर्तता दर्शवितो. त्यांनी लताच्या गळ्यावर व कानावर अभिजात संगीताचे संस्कार केले व हा अलौकिक गांधार जपला, फुलविला. बाबांच्या संस्कारांमुळे अभिनय व गायनाचे बाळकडू तिला जन्मापासून मिळाले. कुशाग्र बुद्धी व असामान्य निरीक्षण शक्ती या गुणांवर ती कुणाही गायक-गायिकेचे गाणे तंतोतंत त्याच्या स्टाइलने गाऊन दाखवत असे. यातूनच कदाचित तिला अवगत असलेली गाण्यातून अभिनय करण्याची कला विकसित झाली असावी. लताचा आवाज साखरेसारखा कुणाही नायिकेच्या गळ्यात सहज विरघळून गोडी निर्माण करणारा होता. हिंदुस्थानातील विविध प्रांतातील अनेक नायिकांचे आवाज तिच्या आवाजात दडलेले होते. त्यांनी त्या काळातील सर्व नायिकांचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, भूमिकांचा अभ्यास केलेला दिसतो. लताच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त नलिनी जयवंत यांनी लताविषयी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. 'लताने गायलेल्या गाण्यावर मला अभिनय करण्याची कधी गरज भासत नसे. तिचे गाणे नुसते गुणगुणले तरी त्या गाण्यातील भाव सहजगत्या प्रदर्शित होत असत.' लता जगातील एक सवरेत्कृष्ट पाश्र्वगायिका आहे. तिच्या मार्दवयुक्त आवाजात लवचिकपणा आहे तर इतर शास्त्रीय गायिकांपेक्षा मर्दानीपणा कमी आहे. रियाज, विद्वत्ता, तंत्र, प्रतिभाशक्ती व गायनाचा अनुभव या बाबतीत तिला उभ्या विश्वांत तोड नाही. लतानी गायलेल्या फिल्मी गाण्यातून, शास्त्रीय राग सर्वसामान्य लोकांना आकलन होतील, अशा सोप्या, सुस्पष्ट रुपात लोकांसमोर आल्यामुळे फार मोठा श्रोर्तृवर्ग याचा आस्वाद घेऊ शकला. याचे श्रेय हिन्दी फिल्मी संगीताला पर्यायाने लताला व पुरुष गायकात मन्ना डेला द्यावे लागेल! आज नाक्यावरच्या पानाच्या ठेल्यावर केशकर्तनालयातही शास्त्रीय संगीत कानावर पडते, ही किमया लताच्या गाण्यांनी केली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आपल्या गाण्यात लताने गायिकेच्या दृष्टीने कितीही अवघड चाल, जागा, हरकती, मुरक्या, पलटे, ताना, आड लय असली तरी कधी तडजोड केली नाही. त्या गाण्यांचे चीजच केले. मग ते गाणे कोणत्याही संगीतकाराचे असो. उदाहरणेच द्यायची तर 'जा मैं तोंसे नाही बोलू' (सौतेला भाई- अनिल विश्वास), 'सांवरे सांवरे' (अनुराधा- पं. रवि शंकर), 'तुझको भुलाना मेरे बस में नही है' (अलिफ लैला- पं. शामसुंदर), 'मनमोहना' (सीमा- शं. जयकिशन). असली अवघड ताना किंवा मुरक्या असलेली गाणी तेच माधुर्य राखून इतक्या तरलपणे, भावनावेगाने ओथंबून गाणे, मला नाही वाटत लता सोडून कधी कुणाला जमले असते. नव्या-जुन्या शास्त्रीय संगीताच्या गायिकांनी हा प्रयत्न जरूर करून पाहावा. 'हाऽऽय कैसे दिन बीते, कैसी बीती रतिया-' (अनुराधा) हा उच्छ्वास टाकणारा हाऽऽयचा उच्चार फक्त लतानेच करावा. आपल्या श्वासावरही लताची हुकूमत जाणवते. तिने नुसते तोंड उघडले तरी तिच्या मुखातून सुरेल शब्दांचा शिडकावा होतो. गाण्यातील तिचे गद्य संवाददेखील इतके सुरेल असतात, की ती बोलतानाही गाते आहे, असे वाटते. उदा. 'झनक झनक पायल बाजे'मधील नैन सो नैन नाही मिलाओ गाण्यातील, 'अच्छा! रुक क्यूं गए' किंवा अलीकडच्या 'आराधना'मधील 'बागों में बहार है' गाण्यातील गद्य संवाद! इतकेच नाही तर लता सुरेलपणे खोकूही शकते. चांगल्या वजनदार गाण्याचा आविष्कार करताना लता श्वास घेते की नाही याचा प्रश्न पडतो. 'बेदर्द तेरे दर्द को सीने से लगा के' (पद्मिनी- मास्टर गुलाम हैदर) अशा गाण्याच्या दोन-तीन ओळी एका श्वासात तिला गाताना बघून ऐकणाऱ्याचा श्वास बंद पडण्याची पाळी येते. लताला घडविण्यात अनेक नव्या-जुन्या संगीतकारांचा वाटा आहे. अगदी खरं आहे; परंतु त्याचबरोबर संगीतकार इतर गायिकांना, निदान स्वत:च्या पत्नीला अथवा लेकीला का घडवू शकले नाहीत? याचासुद्धा विचार होणे आवश्यक आहे. प्रत्येक गाणे गाताना त्यामध्ये लताचे स्वत:चे मोठे योगदान आहे, याचा विसर पडून कसा चालेल? यासाठी 'मधुमती' चित्रपटातील 'ओ बिछुआ' हे समूह नृत्यगीत उदाहरण म्हणून घेऊ. गाण्याच्या अपूर्व यशामध्ये संगीतकार, गायक-गायिका, वादक, निर्देशक व नायिका या सर्वाचा महत्त्वाचा सहभाग आहे; परंतु जाणीवपूर्वक या गाण्याचे श्रवण केल्यास आपल्या लक्षात येते, की खरी रंगत आणली आहे ती लताने व तिच्या गाण्यावर अभिनय करणाऱ्या वैजयंतीमालाने! गाण्यात विषारी विंचवाने कडाडून चावा घेतल्यावर नायिका कळवळून ओरडते. 'ओय ओय ओय' म्हणत लताने ही जागा अशी काही उचलली आहे, की प्रत्यक्ष ध्वनीमुद्रण प्रसंगी मन्ना डे, सलिल चौधरीसारखे विद्वान कलाकारही क्षणभर स्तिमित झाले. इतक्या भावनावेगाने विद्वत्तापूर्वक परंतु सहजरीत्या स्त्रीसुलभ उच्चार फक्त लता आणि लताच करू जाणे! काही प्रतिभावंत संगीतकारांनी शास्त्रीय संगीताच्या मूळ पायावरच अशा काही अफलातून संगीतरचना दिल्या आहेत, की शास्त्रीय संगीताच्या कर्मठ श्रोत्यांनाही हेवा वाटावा. लता सर्वश्रेष्ठ पाश्र्वगायिका का झाली याचे उत्तर तिने गायलेल्या अशा प्रकारच्या काही गाण्यातच दडलेले आहे. 'वो दिन कहा गए बता, जब इस नज़्ार में प्यार था प्यार था वो दिन कहा गए बता' ('तराना') प्यारऽऽर या ठिकाणी घेतलेली नीसारेगमप ही खूबसुरत हरकत, 'मुहब्बत की झुठी' ('मुगल-ए-आजम') या गाण्यातील अंतरा. 'न सोचा न समझा, न देखा न भाला तेरी आरज़ूने हमें मार डाला तेरे प्यार की मेहरबानी पे रोए (प रे सासा सानी सानी रेसानी निसा रेसा ध नी प), 'ऐ दिल मचल मचल के यूं' या गज़्ालमध्ये 'ऐ'वर लावलेला गांधार, 'ये जिन्दगी उसी की है' या गाण्यातील, 'ऐ जिन्दगी की शाम आऽऽऽ या सर्वागसुंदर जागेवर झालेला कोमल निषाद व मध्यमाचा संवाद व आऽऽ 'जिया ले गयो जी मेरा सांवरिया'मधील माधुर्य व लयकारी, 'मोहे भूल गए सावरिया' गाण्याच्या अंतऱ्यामध्ये 'नैन कहे रो रो के सजना' या ठिकाणी 'सजनाऽऽवर घेतलेली लाजवाब हरकत, 'बैरन नींद न आए' इथे 'बै'वर लावलेला परिणामकारक धैवत, झोप जणू काही तिची वैरीणच आहे, असा भास निर्माण करतो. अशा गाण्यांसाठी दुसऱ्या कुण्या पाश्र्वगायिकेची आपण कल्पनाही करू शकत नाही. अत्यंत लवचिक आवाजाचे, क्लासिकल गायक शंकर शंभू म्हणजे कव्वाली गानप्रकारातील मानबिंदू! कव्वालीला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. 'बसा लो अपनी निगाहों में प्यार थोडासा' ('बाजार' : पं. श्यामसुंदर), नाजूक रेशमाची लडी हलकेच उलगडावी तशी यातील 'थोडाऽऽसा' ही हरकत आहे. 'खुशी से भर दिया दामन रक़ीब का तुमनेऽऽ हुजूर मेरे लिये, हुजूर मेरे लिये इकरार थोडा सा' हा शेर अस्सल लाहोरचा पंजाबी ढंग दाखवितो. लताने घेतलेली 'तुमने' ही जागा ऐकताना शंकर शंभूंनाही असुया वाटली असेल! आवाजातील असा हा लवचिकपणा क्वचितच पाहायला मिळतो. पं. हृदयनाथजी स्वत: एक उत्कृष्ट गायक असले तरी माझ्या मनाला त्यांच्यातील स्वतंत्र अभिजात प्रतिभेचा संगीतकार अधिक भुरळ घालतो. त्यांच्या चालीत एखाद्या कुशल सर्कसपटूंनी लीलया हवेत झोके घ्यावेत, तशी सुरांची आंदोलने, चमत्कृती, औत्सुक्यपूर्ण सुरांचे सुखद धक्के पाहायला मिळतात. मग ते चित्रपट गीत असो, भावगीत असो, की कोळीगीत! 'मी डोलकर' या कोळी गीताची निर्मिती करून, कोळी गीताला अशा उंचीवर नेऊन ठेवले आहे, की तिथपर्यंत पोहोचण्याचे भविष्यात कुणी धाडसही करणार नाही. 'या गो दरियाचा दरियाचा दरारा मोठा तवा पाण्यामधून उठताना डोंगर लाटा लाटा' ही अप्रतिम जागा म्हणजे त्यांच्या प्रज्ञेची एक छोटीशी झलक आहे. त्यांनी गायलेल्या हृदयनाथजींच्या संगीतरचना म्हणजे श्रोत्यांसाठी संगीताची पर्वणी असते. सुरुवातीला तिच्या हिन्दी-ऊर्दू शब्दोच्चारांबद्दल शंका घेणाऱ्या टीकाकारांची तोंडे बंद करून टाकली आहेत. खानदानी मुस्लीम संस्कृती प्रधान चित्रपटातील अस्सल ऊर्दू गीतकारांची गाणी तिने गायली आहेतच याशिवाय अस्सल लखनवी तवायफांचा मोगल अंदाजही तिने अनेक गाण्यांतून दाखविला आहे. काळ बदलला, नीतीमूल्ये बदलली त्याप्रमाणे संगीतही बदलले. क्लब, कोठय़ांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. तरूणाईला आकर्षित करण्यासाठी मादक, नशिल्या गाण्यांची निर्मिती होऊ लागली. लताने 'टॅक्सी ड्रायव्हर'मध्ये थोडे चाकोरी बाहेर जाऊन क्लबमधील, दिल से मिला के दिल प्यार कीजिए' गाणे गाऊन धमाल उडवून दिली. 'आ जाने-जां आ मेरा ये हुस्न जवां' हे तिच्या गानप्रकृतीला न शोभणारे कॅब्रे गीतही यशस्वीपणे गाऊन दाखविले. पुढे मात्र असल्या गानप्रकारात विशेष रूची न दाखविता इतरांसाठी हे क्षेत्र खुले ठेवले. भारतीय लोकसंगीतावर आधारित विविध रचना ऐकताना प्रश्न पडतो, की लताची मातृभाषा नक्की कोणती असावी? इतकी ती सफाईदारपणे गाते. भारतातील विविध बोली भाषांतील शब्दोच्चार, त्यातील सौंदर्य, वजन, त्यांचा अर्थ समजून घेण्याची क्षमता, नैसर्गिक लय यावरील तिचे प्रभुत्व जाणवते. अंगाई गीत किंवा लोरी या गानप्रकारात तर लताला तोड नाही. इतक्या हळुवारपणे, वात्सल्याने ओतप्रोत भरलेली, जराही चित्त विचलित होणार नाही, अशी संमोहित करणारी लताची अंगाई व बालगीते ऐकताना नकळत बालपण आठवते. नामदेव, तुकारामाचे अभंग, मीरेची पदे अनेकांनी गायली आहेत. कारण ती सोपी आहेत; परंतु सावरकरांचे संस्कृतप्रचुर काव्य, समर्थ रामदासांचे श्लोक व ज्ञानेश्वरीला चाल लावून गाणे हे मंगेशकरांशिवाय या जगात कुणालाही जमले नाही, ही वस्तुस्थिती आहे. लताचे अलौकिक श्रेष्ठत्व इथे जाणवते. मध्ये, खोडसाळ बातमी प्रसिद्ध झाली, 'लताचे नाव गिनिज बुकातून वगळले गेले' लताच्या हितशत्रूंना काय आनंद झाला. गिनिज बुकात तर दाढी, मिशी, नखे वाढविणाऱ्यांचीही नावे येतात. तो काही संगीतविषयक मान्यवर ग्रंथ नाही, की ज्यासाठी कलाकारांनी हळहळ व्यक्त करावी. तिच्या गाण्यांना संख्येचा मानदंड लावण्यापेक्षा 'दर्जा'ची फूटपट्टी लावायला पाहिजे, हे या पामरांना कधी कळणार? सिनेउद्योगात दर पाच वर्षांनी नायिका बदलते तर दहा वर्षांनी गायिका! याला अपवाद फक्त मंगेशकर भगिनींचा! त्यांच्या संगीत साम्राज्याला धक्का देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला; पण तो निष्फळ ठरला. साठ वर्षे लता संगीतातील सर्वोच्च पदावर ध्रुवासारखी अढळ उभी आहे. सर्वसाधारणपणे वाढत्या वयोमानाचा आवाजावर परिणाम होतो. पोरीची बाई झाली, बाईची आजीबाई झाली ते नुसत्या आवाजावरूनही समजते. लताची गोष्टच वेगळी आहे. सत्तरीपुढची लता खटय़ाळपणे 'दीदी तेरा देवर दीवाना' हे गाणे आपल्या नातीच्या वयाच्या माधुरी दीक्षितसाठी गाते तेव्हा तिची कमाल वाटते. या वयातही आवाज ताजा, टवटवीत राहणे हा मंगेशाचा कृपाशीर्वादच नव्हे तर दुसरे काय असावे? गाण्यात अवघे पाऊणशे वयोमानाची लता आजही त्याच उत्साहाने व जोमाने संगीताचा जाहीर कार्यक्रम करते आणि मजा म्हणजे एरवी वायफळ खर्च करताना हजार वेळा विचार करणारे मुंबईकर रसिक श्रोते निढळाच्या घामाचे शेकडो रुपये खर्च करून हजारोंच्या संख्येने, लताचे अलौकिक स्वर्गीय स्वर आपल्या कानावर पडावेत या अभिलाषेने अंधेरी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर तोबा गर्दी करतात. धन्य ती गायिका आणि धन्य ते रसिक श्रोते! जगातील सर्व जाती-धर्माचे लोक एकाच सुरांच्या छत्राखाली खेचून आणण्याची ताकद लता आणि फक्त लताच्या सुरांमध्ये आहे. जणू तिचे स्वर रसिक मनाला सांगत आहेत, 'अगर मेरी सुरों में तासीर है, (तासीर- प्रभाव) तो खिंच के मेरे पास आओगे तुम' हिन्दुस्थानच्या मातीला संगीताचा सुगंध आहे. या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येक भारतीयाच्या नसानसात संगीत भिनलेले आहे. आपले प्रत्येक सणवार, उत्सव संगीताशिवाय अधुरे आहेत. संगीत हीच आपली संस्कृती आहे. त्यामुळेच हिन्दुस्थान ही कलाकारांची खाण आहे. इथे लाखो-करोडो कलाकार आहेत. त्यांना दाद देणारे रसिक-श्रोतेही आहेत; परंतु आजही लताला गाताना पाहून मनात एकच विचार येतो-
'जब हम गाए तो गला भी न अपना साथ दे पर जब लता गाए तो उनका गला गाए, दिल गाए, दिमाग गाए जब हम रुके तो साज़्ा रुके, आवाज रुके पर जब लता रुके तो सांस रुके, धडकन रुके' _________________________
|
No comments:
Post a Comment